Nashik News: धर्म म्हणजे कर्म Maharashtra Times

Nashik NEWS


स्वामी स्वरूपानंद सरस्वती यांचे प्रतिपादन

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

धर्माच्या सहाय्याने पुरुषार्थ करणे आणि आपल्या कामाला पूर्ण करतो
त्याने मानव जन्मात येऊन कल्याण करून घेतले असे म्हणता येईल. धर्म
म्हणजे कर्म मानून कार्य कले की सर्व सोपे होते आणि धर्माच्या
व्याख्या इतरत्र शोधत बसले की अडचण निर्माण होते, असे प्रतिपादन
फुलगाव आश्रमाचे संस्थापक स्वामी स्वरूपानंद सरस्वती यांनी केले.

शंकराचार्य संकुल आणि शिवशक्ती ज्ञानपीठ, त्र्यंबकेश्वर
यांच्यातर्फे स्वामी स्वरूपानंद सरस्वती यांचे ‘भक्तियोग : गीता
अध्याय १२’ या विषयावर सुश्राव्य व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात
आले. यावेळी ते बोलत होते. अर्जुनाने भगवान श्रीकृष्णांना विचारले
की, ‘मम धर्म: क:’ माझा धर्म कोणता? मी आप्तेष्टांसमवेत युद्ध
करणे हे माझे कर्तव्य की धनुष्य सोडून देऊन विरक्ती पत्करणे हा
माझा धर्म? त्यावेळी भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला कर्माची महती
समजावून सांगितली. कर्म हाच धर्म आणि धर्म हेच कर्म असे समजून तू
युद्धाला तयार हो असे त्यांनी सांगिल्याचे स्वामी यांनी नमूद
केले.

धर्मावर विवेचन करताना स्वामी स्वरूपानंद यांनी सांगितले, की
माणसाला जो धारण करतो तो धर्म आणि पुढे कर्म हाच त्याचा धर्म
बनतो. डबक्यातल्या पाण्यात जगावे आणि मरून जावे असे कुणालाही वाटत
नाही तर आपला उत्कर्ष व्हावा, आपण चांगले जीवन जगावे असेच
प्रत्येकाला वाटते. कर्मप्रवृत्तीच्या मागे कामना असते.
व्यावहारिक, धार्मिक, शास्त्रीय, वैदिक कोणतेही कर्म असो त्यामागे
कामना असते. ती कामना म्हणजेच माझा उत्कर्ष व्हावा.
कामनापूर्तीसाठी एकच साधन आहे, ते म्हणजे कर्म असेही ते म्हणाले.

रविवारपर्यंत प्रवचनलाभ

मंत्रोच्चाराने व्याख्यानाची सुरुवात करण्यात आली. १२ व्या
अध्यायाचे पठण यावेळी करण्यात आले. जुन्या गंगापूर नाक्यावरील
कुर्तकोटी सभागृहात रविवारपर्यंत (दि. ८) दररोज सायंकाळी ६.३० ते
८ या दरम्यान होणाऱ्या या कार्यक्रमाचा सर्वांनी लाभ घ्यावा, असे
आवाहन शंकराचार्य न्यास व शिवशक्ति ज्ञानपीठ यांनी केले आहे.Source link